शीलेश शर्मा, नवी दिल्ली - महाराष्ट्रात नेतृत्वबदलासाठी राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्यासाठी प्रयत्नशील असले तरी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत चांगले यश मिळण्याची आशा करू नये, असे पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात, नारायण राणे, नितीन राऊत, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगितल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. पतंगराव कदम यांनी पक्षाध्यक्षांची भेट घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला, याची विस्तृत माहिती श्रेष्ठींना दिल्याचे सांगितले. काँग्रेसच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी मागील तीन दिवसांपासून नेतृत्वबदलाबाबत श्रेष्ठींचे मन वळविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्रात फेरबदल करू इच्छितात, मात्र संबंधित बदल सरकार किंवा पक्षसंघटनेत होणार असल्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे १० जनपथच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यात राज्यपालांच्या वतीने नियुक्त केल्या जाणार्या विधानपरिषदेच्या सदस्यांची नावे निश्चित करणे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तसेच निवडणुकीच्या रणनीतीवर काँग्रेस वॉररूममध्ये तब्बल ५ तास चर्चा झाली. मात्र या चर्चेत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते.
नेतृत्वबदल आता नाही
By admin | Updated: May 29, 2014 02:47 IST