लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आज देशात केवळ अवकाश क्षेत्रातच २०० पेक्षा अधिक स्टार्टअप्स कार्यरत असून, देशातील मुला-मुलींमध्ये अवकाशाविषयी उत्सुकतेची नवी लाट निर्माण झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते रविवारी रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ते बोलत होते. पाच वर्षांपूर्वी अवकाश क्षेत्रात ५० पेक्षा कमी स्टार्टअप्स होते, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वीवर सुखरूप परतण्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, शुभांशू शुक्ला अवकाशातून परतल्यावर संपूर्ण देश आनंदात न्हाला होता. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात अभिमानाची भावना निर्माण झाली होती.
या क्षेत्राचे आकर्षण वाढण्याची प्रमुख कारणे कोणती?
- २०२० नंतर खासगी कंपन्यांना अवकाश क्षेत्र खुले; केंद्राकडून स्टार्टअप्ससाठी १,००० कोटी रुपयांचा व्हेंचर फंड जाहीर.
- एंजल टॅक्स रद्द, १०० टक्के एफडीआय; इस्रोकडून तांत्रिक मदत, लॉन्च साइट्स व डेटा वापरास परवानगी.
- कमी खर्च, नावीन्यता, लाँच व्हेईकल्स, स्पेस बेस्ड ॲप्लिकेशन्स, स्पर्धात्मक किमती ही मोठी ताकद.
- कनेक्टिव्हिटी, रिमोट सेन्सिंग, वातावरण व शेतीसाठी डेटा, सॅटेलाइट इंटरनेट, इ. क्षेत्रांत मोठी जागतिक मागणी.
- नवीन पिढीमध्ये अवकाशाबद्दल आकर्षण, स्पर्धा व ऑलिम्पियाडमधून प्रतिभेला संधी.
- नासा, इसा, स्पेसएक्ससारख्या जागतिक संस्थांचे स्टार्टअप्सना सहकार्य व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त मिशन्स.
आघाडीच्या कंपन्यांत कोण-कोण?
पिक्सेल, अग्निकुल, स्कायरूट एअरोस्पेस, ॲस्ट्रोगेट लॅब्स, आद्याह स्पेस, बेलाट्रिक्स एअरोस्पेस, इन्स्पेसिटी, ध्रुव स्पेस.
२४ ऑगस्टला ‘राष्ट्रीय अवकाश दिन’
येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ साजरा केला जाणार असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, विकसित भारत स्वयंपूर्णतेतूनच साकार होणार असून ‘व्होकल फॉर लोकल’ हा ‘आत्मनिर्भर भारता’चा मजबूत आधार आहे.