नवी दिल्ली : येत्या १५ ते २० दिवसांत किमान सहा राज्यांत नव्या राज्यपालांची वर्णी लागण्याची शक्यता आहे़ खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज रविवारी याबाबतचे संकेत दिले़येत्या काही दिवसांत सहा ते सात राज्यांत नवे राज्यपाल नियुक्त करण्याची सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले़ बिहार, आसाम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांतील राज्यपालांची पदे रिक्त आहेत, तर पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील येत्या २१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत़ हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल ऊर्मिला सिंह यांचा कार्यकाळही येत्या २४ जानेवारीला संपत आहे़पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी हे बिहार आणि मेघालयचा अतिरिक्त प्रभार सांभाळून आहेत, तर नागालँडचे राज्यपाल पी़ बी़ आचार्य आसाम आणि त्रिपुराचा अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत़ उत्तराखंडचे राज्यपाल केक़े़पॉल यांच्याकडेही मणिपूरच्या अतिरिक्त राज्यपालपदाची जबाबदारी आहे़ तामिळनाडूचे राज्यपाल के़रोसेय्या आणि ओडिशातील त्यांचे समकक्ष एस़ सी़ जमीर दोघेही येत्या काही महिन्यांत निवृत्त होत आहेत.रोसेय्या आणि जमीर यांना काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आले होते़ भाजपाप्रणीत रालोआ सरकारने सत्तेवर येताच संपुआ सरकारने नियुक्त केलेल्या अनेक राज्यपालांची उचलबांगडी केली होती़ तथापि हे द्वयी मात्र या पदावर कायम आहेत़रालोआ सरकारने आतापर्यंत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि गोवा या राज्यांत राज्यपाल नियुक्त केले आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
सहा राज्यांना मिळणार नवीन राज्यपाल
By admin | Updated: January 19, 2015 02:34 IST