उतारवयातही उत्साह कायम : वयाच्या ९७व्या वर्षीही बजावले कर्तव्य
काल्पा (हिमाचल प्रदेश) : स्वतंत्र भारतातील पहिला मतदार ठरण्याचा अधिकृत मान ६३ वर्षांपूर्वी मिळविणाऱ्या ९७ वर्षांच्या श्याम शरण नेगींनी बुधवारी पुन्हा एकदा पहिला नंबर लावून लोकसभेसाठी उत्साहाने मतदान केले. उतारवयातही आपले कर्तव्य बजावून मतदानाबाबत जनजागृती निर्माण करीत असलेल्या श्याम शरण नेगी यांचा जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कारदेखील केला. आपल्या घरापासून एक किमी चालत नेगी आणि त्यांची ९२ वर्षांची पत्नी हिरामणी किनौर जिल्ह्यातील रेकाँगपेओ जवळील काल्पा येथील मतदान केंद्रावर स. ६.५५ वाजता पोहोचले. या मतदान केंद्रावरील मतदारयादीत नेगी यांचे नाव १२३ व्या क्रमांकावर होते.
सात वाजता मतदान सुरु होताच नेगी यांनी पहिल्या क्रमांकावर मतदान केले व त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीनेही मतदान केले. विशेष म्हणजे ५० क्रमांकाचे हे मतदान केंद्र ज्या शाळेत आहे त्याच शाळेत २३ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी करून नेगी १९७५ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. किनौरचे महसूल उपायुक्त डी. डी. शर्मा यांनी नेगी पती-पत्नीचे मतदान केंद्रावर स्वागत केले व मतदान करून बाहेर आल्यावर टोपी आणि स्कार्फ देऊन शर्मा यांनी नेगी यांचा सत्कार केला. नेगी यांनी मतदान केले ते मतदान केंद्र मंडी लोकसभा मतदारसंघातील किनौर विधानसभा क्षेत्रात येते. नेगी यांनी लोकसभेसाठी केलेले हे सातवे मतदान होते. (वृत्तसंस्था)
देशातील पहिला मतदार संपूर्ण देशात सर्वप्रथम मतदान करणारा मतदार म्हणून नेगी यांची सरकारने अधिकृतपणे नोंद केलेली आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या पहिल्या लोकसभेसाठी किनौरमध्ये २५ आॅक्टोबर, १९५१ रोजी मतदान झाले तेव्हा नेगी यांनी केलेले मतदान हे संपूर्ण देशात केले गेलेले पहिले मतदान ठरले होते.
लोकसभेची ती निवडणूक अनेक टपप्यांमध्ये झाली होती व देशाच्या इतर भागांत फेब्रुवारी १९५२ मध्ये मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी नेगी ३० वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशच्या दुर्गम व आदिवासी भागांत मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच नेगी यांना ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसॅडर’ नेमले आहे.