ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ६ - काँग्रेसमधील 'हायकमांड' संस्कृतीचा पुनर्विचार करण्याची गरज असून प्रदेश काँग्रेस समितीलाही पुरेशे स्वातंत्र्य मिळायला हवे असे परखड मत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांनी मांडले आहे.
तामिळनाडूमधील काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला असून माजी केंद्रीय मंत्री व्ही. के.वासन यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते कार्ति चिदंबरम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसमधील कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजीच व्यक्त केली. 'तामिळनाडू काँग्रेसमध्ये आपले निर्णय स्वतः घेण्याची क्षमता असायला हवी. राज्यात काँग्रेसला सक्रीय होण्याची गरज असून दरवेळी निर्णय घेण्यासाठी दिल्लीकडे बघायची गरजेचे नाही असे विधान कार्ति चिदंबरम यांनी केले. आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसारच काम केले पाहिजे, पण राज्य काँग्रेसलाही स्वातंत्र्य द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. कार्ति चिदंबरम यांच्या विधानामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पी. चिदंबरम यांनीदेखील काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याती आवश्यकता व्यक्त केली होती.