ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आजच्या छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असणा-या दंतेवाडाच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी ४०० गावक-यांना ओलीस ठेवले आहे. पंतप्रधानांच्या सभेला जाणा-या सुकमा जिल्ह्यातील मरेंगा गावातील ४०० गावक-यांचे आज सकाळी अपहरण करण्यात आले असून त्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांना नेमके कोठे ठेवण्यात आले आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मरेंगा गावातील ४०० नागरिक आज सकाळी सभेत सहभागी होण्यासाठी गावातून निघाले, ते मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचणार तितक्यात सुमारे १०० नक्षलवादी तेथे पोहोचले. बंदुकीचा धाक दाखवत नक्षलवादी सर्व गावक-यांना जंगलाच्या दिशेने घेऊन गेले. या ओलीस नाट्यानंतर गावात प्रचंड दहशत माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावक-यांच्या सुटकेसाठी पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. मरेंगा हे गाव दंतेवाडापासून ७० किलोमीटर अंतरावर असून या परिसरात तब्बल ६०० नक्षलवादी असल्याची शंका व्यक्त होत आहे.