ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ला घडवणा-या 'तहरीक ए तालिबान पाकिस्तान जमात उल अहरार' या दहशतवादी संघटनेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी 'बदला' घेण्याचा इशारा दिला आहे. 'तुम्ही शेकडो मुसलमानांच्या हत्येसाठी जबाबदार असून आम्ही गुजरात आणि काश्मीरमध्ये मारले गेलेल्या निष्पापांचा बदला घेऊ' असे ट्विट या संघटनेच्या म्होरक्याने केले आहे.
रविवारी वाघा बॉर्डरजवळ पाकिस्तानमध्ये भीषण बाँबस्फोट घडवण्यात आला होता. या हल्ल्यात सुमारे ६१ जण ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी घेणा-या जमात उल अहरारचा प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने ट्विटरवर नुकतेच ट्विट केले होते. यामध्ये त्यांने नरेंद्र मोदींचा बदला घेण्याचा इशारा दिला होता. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी वाघा बाँबस्फोटानंतर नरेंद्र मोदींना जिहादी दहशतवादी संघटनांचे वाढते प्राबल्य आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या भारतातील दहशतवादी संघटना याची सखोल माहिती दिल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. या संघटना कट्टर जिहादी संघटना असून पाकिस्तानमधील सत्ता नष्ट करुन तिथे शरीया कायद्याची अंमलबजावणी करण्याचे या संघटनांचे धोरण आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा धोक्याचा इशारा असल्याचे जाणकार सांगतात.