लखनऊ: ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण दत्त तिवारी यांनी रोहित शेखर या युवकाचे जैविक पितृत्व दोन महिन्यांपूर्वी मान्य केल्यानंतर आता ते त्याच रोहितची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी रीतसर विवाहबद्ध झाले आहेत. ८९ वर्षांचे तिवारी आणि ६७ वर्षांच्या शर्मा यांचा विवाह तिवारी यांच्या येथील मॉल रोडवरील निवासस्थानी पारंपारिक पद्धतीने पार पडला. तिवारी यांनी रोहितचे पितृत्व मान्य केल्यानंतर त्यांनी आपल्यालाही स्वीकारावे, असे उज्ज्वला शर्मा यांचे रास्त म्हणणे होते. पण तिवारींच्या घरात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात त्या घराबाहेर धरणे धरले होते. अखेर नारायण दत्त यांनी उज्ज्वला यांना घरात प्रवेश दिला व गेले काही दिवस ती दोघं एकत्र राहात होते. आता औपचारिक विवाहाने ती दोघं अधिकृतपणे पती-पत्नी झाले आहेत. विवाहानंतर पत्रकाराशी बोलताना उज्ज्वला शर्मा म्हणाल्या करी, आमचे संबंध खूप जुने असून आम्हाला ३५ वर्षांचा मुलगा आहे. अखेर या संबंधांना सामाजिक मान्यता देऊन तिवारीजी विवाह करायला तयार झाले, याचा मला आनंद आहे. आता विवाहानंतरच्या औपचारिकता पूर्ण केल्यावर आम्ही सर्वांना आमंत्रित करू. ज्येष्ठ काँग्रेस नेते असलेले नारायण दत्त तिवारी उत्तर प्रदेशचे तीन वेळा व उत्तराखंडचे एकदा मुख्यमंत्री राहिले आहेत. नंतर २००७ ते २००९ मध्ये ते आंध्र प्रदेशचे राज्यपालही झाले. पण तेथील राजभवनातील त्यांच्या कथित लैंगिक व्यभिचाराचे व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर त्यांना ते पद सोडावे लागले होते.
एन. डी. तिवारी पुन्हा विवाहबद्ध
By admin | Updated: May 16, 2014 04:02 IST