ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - सोळाव्या लोकसभेच्या दुस-या दिवसाच्या कामकाजाला गुरूवारी सुरूवात झाल्यानंतर नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे जालन्यातील खासदार व मोदींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठीत शपथ घेत मराठी जनतेला सुखद धक्का दिला. मात्र नितीन गडकरी व अनंत गीते यांनी हिंदीतूनच खासदारकीची शपथ घेण्यास प्राधान्य दिले.
दरम्यान परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, उमा भारती, डॉ.हर्ष वर्धन, मीनाक्षी लेखी, ओम प्रकाश यादव आदी नेत्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.
लोकसभेच्या कामकाजाला बुधवारी सुरूवात झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. आज (गुरूवार) दुस-या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही खासदारकीची शपथ घेतली.