नवी दिल्ली : भारत-तिबेट सीमा पोलीस दलाने मानसिक आजारी असलेल्या आपल्या १०० पेक्षा जास्त जवानांना सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. हे जवान अल्झायमर आणि इतर उपाय नसलेल्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. आयटीबीपीचे जवान डोंगराळ भागातील लढाईत निपूण असतात. गेल्या दहा आणि त्यापेक्षा अधिक काळापासून कार्यरत असलेले काही जवान आपल्या सहकाऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात किंवा सीमेवर निगराणी किंवा देशांतर्गंत सुरक्षेची संवेदनशील जबाबदारी पार पाडताना अडचणीचे ठरू शकतात, असे दिसून आल्याने आयटीबीपीला धक्का बसला. जवानांना मानसिक आजार होण्याचे नेमके कारण कळू शकलेले नाही, असे अधिकारी आणि दलाच्या आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही जवानांना आनुवांशिक कारणामुळे आणि काहींना कर्तव्यावर असताना तणाव किंवा कौटुंबिक तणावामुळे मानसिक आजार झाल्याची शक्यता आहे. अनेकांवर उपचार सुरू आहेत. दलात सध्या असे ४० हून अधिक जवान आहे. परंतु बहुतांश प्रकरणात अनुवांशिक किंवा कौटुंबिक कारणे आढळून आली आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१०० पेक्षा जास्त मनोरुग्ण जवानांना निवृत्ती देणार
By admin | Updated: August 25, 2014 04:30 IST