नवी दिल्ली : एखादा महत्त्वाचा पाहुणा येणार असेल तर त्याच्या भेटीमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये, आपल्याकडील ओंगळवाण्या गोष्टी त्यांच्या दृष्टीस पडू नयेत असा आपला प्रयत्न असतो. त्यासाठी आपण साफसफाईसह विघ्ने आणू शकणाऱ्या किंवा फजिती करू शकणाऱ्या गोष्टी दूर करतो. नवी दिल्लीमध्ये या आठवड्यात हाच खटाटोप सुरू होता. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्याला काही दिवसांचा अवधी असतानाच ‘स्वच्छते’चे आदेश दिले गेले. मोकाट गायी पकडणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठीमागील वाहतुकीची अजिबात तमा न बाळगता रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांच्या मुसक्या आवळण्यास सांगण्यात आले. याशिवाय राष्ट्रपती भवन आणि आसपासच्या परिसरातील शेकडो माकडांना पळविण्यासाठी गलूलधारी तैनात करण्यात आले. शहर कर्मचारी अहोरात्र रस्त्यांवर फेऱ्या मारून भिकाऱ्यांना तीन दिवस शिबिरामध्ये थांबण्याचा आग्रह धरताना दिसून येतात. (नवी दिल्ली महापालिकेचे अध्यक्ष जलज श्रीवास्तव म्हणाले की, हे पाहा मी एका मर्यादेपलीकडे जाऊन लष्करी मोहीम राबवू शकत नाही.) फेरीवाले, रस्त्याच्या कडेला बसून चप्पल, बुट शिवणारे तसेच काळ्या बाजारातील पुस्तक विक्रेते अचानक गायब होत आहेत. ‘समजा तुमच्या घरात विवाह सोहळा आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण घर स्वच्छ करता. आमचे सरकार तेच करीत आहे. संपूर्ण शहर लख्ख करण्यात येत आहे, असे शहरातील एक पुस्तक विक्रेते विनोद पहुजा यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी ओबामा निघून गेल्यानंतर असा प्रश्न केला असता पहुजा हसत म्हणाले, सर्वकाही पूर्वीप्रमाणे होईल. जगभरातील अनेक देश अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी आपली लक्तरे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास कच्चे दुवे झाकतात. दक्षिण कोरियाने १९८८च्या आॅलिम्पिकदरम्यान अगदी टुथब्रशने रस्ते स्वच्छ केले होते. मात्र, भारताच्या राजधानीत वेगळीच समस्या आहे. येथील बाजारपेठा आणि रस्त्यांवर मोकाट गुरांचा मुक्त संचार असतो. या गुरांचा बंदोबस्त हेच प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. गुरांना हात लावू नये, अशी भारतीयांची धारणा आहे. त्यामुळे आम्ही अधीक कडक पावले उचलू शकत नाही, असे नवी दिल्ली महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. सौम्या शुक्ला यांनी सांगितले. माकडांनी येथे उच्छाद मांडलेला आहे. अगदी स्वयंपाकघरात घुसण्यापर्यंत त्यांची हिंमत वाढलेली आहे. हिंदूधर्मीय माकड, वानर यांना हिंदू देवता हनुमान यांचे वंशज मानतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जनक्षोभ निर्माण होईपर्यंत त्यांचा बंदोबस्त करणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. आसपासचे जंगल नष्ट झाल्यामुळे त्यांनी भारताच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या घरात असलेल्या झाडांचा आश्रय घेतला आहे.माकडांमुळे अधिकारी घरात अडकून पडल्याचे अनेक प्रकारही घडले आहेत. या माकडांना पकडता येत नाही तसेच हुसकावून लावता येत नाही. हुसकावून लावले की काही तासांनी ते पुन्हा येतात. हिंदू धर्मात गायीला देवता मानले जाते. तिच्या शरीरात साक्षात देव वसतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रस्त्यांवरील गायींच्या बंदोबस्ताचीही समस्या आहे.
मोकाट गायी, माकडांच्या सफाईसाठी हाती घेतला झाडू
By admin | Updated: January 25, 2015 02:15 IST