गुरुवारी लागली १.४८ कोटींची बोली : आज होणार अंतिम निर्णयसूरत : येथील लिलावात ठेवण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या वादग्रस्त कोटाची किंमत गुरुवारी दुसऱ्या दिवशी १.४८ कोटीवर गेली आहे. आतापर्यंतची ही सर्वोच्च बोली आहे. आज २० फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांना या कोटासह लिलावात ठेवलेल्या ४५५ भेटवस्तूंची बोली लावता येणार असून त्यानंतर सर्वाधिक बोली लावणाऱ्यास या वस्तूंची विक्री केली जाईल.हिरे व्यापारी आणि लीला ग्रूप आॅफ कंपनीजचे मुख्य प्रबंध संचालक कोमलकांत शर्मा यांनी मोदींच्या या सूटसाठी १ कोटी ४१ लाख रुपये देऊ केले होते. सकाळी सर्वप्रथम ग्लोबल मोदी फॅन क्लबची स्थापना करणारे स्थानिक कापड व्यापारी राजेश माहेश्वरी यांनी हा कोट १ कोटी २५ लाख रुपयांना खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. बुधवारी आणखी एक कापड व्यापारी राजेश जुनेजा यांनी १ कोटी २१ लाख रुपयांची बोली लावली होती. या बोलीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशीची पटेल यांची बोली २७ लाखांनी जास्त आहे. या लिलावात मोदी यांच्या गडद निळ्या रंगाच्या आणि त्यांच्या संपूर्ण नावाच्या उभ्या पट्ट्या कापडातच विणलेल्या या कोटचा प्रचंड बोलबाला आहे. मोदी यांनी हा सूट गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीदरम्यान परिधान केला होता. गुरुवारी सायंकाळी सुरतमधील हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी आपली बोलीची रक्कम १ कोटी ३९ लाखावरुन १ कोटी ४८ लाख करीत सर्वांनाच धक्का दिला.