जयशंकर गुप्त, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना लक्ष्य ठरविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ६६ पैकी १७ म्हणजे एक चतुर्थांश मंत्री या दोन राज्यांतील आहेत. बिहारमध्ये पुढीलवर्षी तर उत्तर प्रदेशात दोन तीन वर्षांत विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आत्तापासूनच या दोन राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.‘किमान शासन अधिकाधिक प्रशासन’ असा नारा देणाऱ्या मोदींनी नव्या विस्तारात मंत्र्यांची संख्या ६६ पर्यंत वाढविली आहे. प्रत्यक्षात ते १३-१४ मंत्र्यांना स्थान देऊ शकले असते. या विस्तारात त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक प्रतिनिधित्व दिले आहे. या राज्यातून स्वत: मोदींसह गृहमंत्री राजनाथसिंग, जलसंसाधन मंत्री उमा भारती, सूक्ष्म उद्योगमंत्री कलराज मिश्र, कृषी आणि अन्नप्रक्रिया राज्यमंत्री संजीव बाल्यान यांना स्थान आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही उत्तर प्रदेशातूनच राज्यसभेवर निवडून आणले जाईल. महेश शर्मा राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), मुख्तार अब्बास नकवी, राम शंकर कठेरिया आणि साध्वी निरंजन ज्योती यांना राज्यमंत्री बनविण्यात आले आहे. त्यापैकी तिघे ब्राह्मण, एक राजपूत, तीन मागासवर्गीय, प्रत्येकी एक जाट, मुस्लीम आणि दलित आहे. बिहारचे राजकीय समीकरण डोळ्यासमोर ठेवत विस्तारात राजपूत, भूमिहार आणि यादव समुदायाला स्थान मिळाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजीवप्रताप रुडी यांना राज्यमंत्र्यांचा स्वतंत्र प्रभार मिळाला आहे. वादग्रस्त विधाने आणि आपल्या निवासस्थानावर १.१४ कोटी रुपये खर्च केल्यामुळे चर्चेत आलेले गिरीराजसिंग तसेच कधीकाळी लालूप्रसाद यादव यांचा उजवा हात राहिलेले रामकृपाल यादव यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडली. रामकृपाल यांनी लालूप्रसाद यांच्या कन्या मिसा भारती यांचा पराभव केला होता. या राज्यातून यापूर्वी कृषिमंत्री राधामोहन सिंग, कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान, पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांना स्थान दिले होते. बिहारमधील मंत्र्यांची संख्या सात झाली आहे. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा यांच्या रूपाने झारखंडला प्रतिनिधित्व मिळाले आहे. लोकप्रिय गायक बाबुल सुप्रियो यांना राज्यमंत्री बनवत मोदींनी प.बंगाललाही स्थान दिले. ईशान्येतून आसाम आणि नागालॅडला प्रतिनिधित्व मिळेल अशी अपेक्षा होती. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांच्या चमूची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहेत.
मोदींचे पुढचे लक्ष्य यूपी, बिहार विधानसभा
By admin | Updated: November 10, 2014 03:22 IST