ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - नऊ वर्षांनी होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिल्डिंग लावली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश या महिन्यांच्या अखेरीस भारत दौ-यावर असून या दौ-यात बॅश मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीत दोघांमध्ये ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०२४ मध्ये होणा-या ऑलिम्पिकचे यजमान पद मिळवण्यासाठी येत्या काही महिन्यांमध्ये बोली लावली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकच्या आयोजनाचा मान भारताला मिळावा यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मोदींना यजमानपदासाठी बोली लावण्याची इच्छा आहे. बोली लावताना ५०० कोटी रुपयांचे हमी पत्र द्यावे लागते. त्यादृष्टीने मोदी व त्यांची टीम अभ्यास करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ऑलिम्पिकचे आयोजन अहमदाबादमध्ये होईल अशी चर्चा असली सूत्रांनी चर्चा निरर्थक असल्याचे सांगितले. यजमानपदासाठी बोली लावावी की नाही, त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ, स्पर्धेसाठी लागणा-या सोयी सुविधा अशा विविध बाबींचा सध्या अभ्यास केला जात आहे. मग आधी शहराची निवड कशी केली जाईल असा प्रश्न एका अधिका-याने उपस्थित केला.
पंतप्रधान मोदींना यजमानपदासाठी बोली लावायची इच्छा आहे. पण काही वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात भारताची नाचक्की झाली होती. मोदींना याची पुनरावृत्ती नको असल्याने ते सावधपणे पावलं टाकत आहेत असे एका इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे.
२०२४ मध्ये ऑलिम्पिकच्या यजमानपदाचे दावेदार
> १५ जानेवारी ते १५ सप्टेंबर या कालावधीत २०२४ मधील ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी बोली लावता येईल.
> रोम, बोस्टन आणि हॅमबर्ग यांनी आधीपासूनच या स्पर्धेसाठी बोली लावली आहे.
> कतार, केनिया, फ्रान्स, रशिया हे देशही या स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी इच्छूक आहेत.