हरीश गुप्ता, नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्यासाठी आणि ‘धोरण लकवा’ दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० कलमी कृती कार्यक्रम जाहीर केला आहे़ केवळ एवढेच नाही तर आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पहिल्या १०० दिवसांचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत़ पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची दुसरी बैठक पार पडली़ या बैठकीत मोदींनी सर्वाधिक महत्त्वाच्या १० धोरणात्मक प्राधान्यक्रमांची काय करावे नि काय करू नये (डूज अॅण्ड डोण्ट्स), हे सुचवणारी दशसूत्री जाहीर केली़ याउपरही आपल्या मंत्र्यांना त्यांनी पहिल्या १०० दिवसांच्या प्राधान्याने कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले़ कळीचे मुद्दे निर्धारित वेळात सोडवावेत, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली़ राज्यांचे प्रस्ताव, तक्रारी आणि निवेदनांना महत्त्व देऊन ते तेवढ्याच तत्परतेने मार्गी लावले जावेत, असेही मोदींनी आजच्या कॅबिनेट बैठकीत सांगितले़ राज्यांच्या प्रश्नांना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देण्याचा सल्ला त्यांनी या वेळी दिला़ आपल्या दशसूत्रीमध्ये मोदींनी सरकारच्या कामात पारदर्शकता आणण्यावरही भर दिला़ यासाठी ई-लिलाव लागू करण्याचे त्यांनी म्हटले़ याशिवाय, गुंतवणूक व पायाभूत सुविधा क्षेत्रावरही त्यांनी भर दिला़
मोदींची दशसूत्री
By admin | Updated: May 30, 2014 01:39 IST