ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १५ - एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएची सत्ता येईल असे भाकीत वर्तवले जात असतानाच भाजपमध्ये मंत्रिमंडळातील खातेवाटपावरुन चर्चाही सुरु झाली आहे. मोदी सत्तेवर आल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात आडवाणींना स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते. मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी आडवाणींना राष्ट्रीय सल्लागार समिती किंवा लोकसभा अध्यक्षपद दिले जाईल असे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे.
१६ व्या लोकसभेसाठी मतदान पार पडले असून शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीत केंद्रात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. मात्र विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचे नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असे भाकीत वर्तवले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये खलबते सुरु झाली आहेत. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे, कोणाकडे कोणत्या खात्याची जबाबदारी द्यायची यावर भाजपात चर्चा सुरु आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मोदींच्या मंत्रिमंडळात आडवाणींचा समावेश केला जाणार नाही. तर नाराज नेत्या सुषमा स्वराज यांना परराष्ट्र किंवा लोकसभा अध्यक्षपद दिले जाईल असे समजते.
मोदींच्या मंत्रिमंडळातील संभावीत मंत्री
राजनाथ सिंह - संरक्षण किंवा गृहमंत्री
अरुण जेटली - अर्थमंत्री
मनेका गांधी - पर्यावरण मंत्री
रविशंकर प्रसाद - कायदा मंत्री
मुख्तार अब्बास नकवी - अल्पसंख्यांक खाते
स्मृती इराणी - माहिती व प्रसारण मंत्री
शाहनवाझ हुसैन - नागरी उड्डाण मंत्री
उमा भारती - महिला व बालकल्याण मंत्री