ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ४ - नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर भारत देशाचे पंतप्रधान आहेत असे सांगत जशी पाकव्याप्त काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत केली तसेच कर्ज माफ करून महाराष्ट्रातील शेतक-यांना मदत करा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते अकोल्यातील सभेत बोलत होते.
फक्त मतं मागू नका तर शेतक-यांची कर्ज माफ करा, असे आवाहन त्यांनी मोदींना केले. महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर, शिवसेनेवर विश्वास ठेवून लोकसभा निवडणूकत मतदान केलं आणि मोदी पंतप्रधान झाले, केंद्रात सत्ता आणण्यात शिवसनेनेही मेहनत केली होती, मात्र भाजपाला आता त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही असे सांगत उद्धव यांनी वेगळ्या विदर्भाला स्पष्ट विरोध दर्शवला. विदर्भ माझा आहे, माझी आजी विदर्भातील आहे, त्यामुळे माझं त्याच्याशी नातं आहे, असे सांगत त्यांनी आपण वेगळा विदर्भ होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. शिवसेना सत्तेवर आल्यावर मी तुमच्या घरात शिवप्रकाश आणणार आहे, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅब्लेट देणार असेही त्यांनी सांगितले.