शीलेश शर्मा,नवी दिल्लीमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची संपूर्ण प्रचार मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान देशातील जनतेला दिलेल्या ‘खोट्या’ आश्वासनांवर केंद्रित राहणार आहे़उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसश्रेष्ठींनी तसे निर्देश दिले आहेत़‘अच्छे दिन’ कुठे गेले?, महागाई कमी झाली का?, काळा पैसा परत आला का? पाकिस्तानलगतची सीमा पूर्णत: सुरक्षित आहे का? असे सवाल आपल्या प्रचार सभेत उपस्थित करण्याचे महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांना सांगण्यात आले आहे़ पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हरियाणातून या प्रचार रणनीतीची सुरुवातही केली आहे़ हरियाणातील मिहम आणि सीरसा येथून सोनियांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला़ या दोन्ही सभेत त्यांनी मोदींच्या खोट्या आश्वासनांवर हल्ला चढवला़ यामुळे भाजपा डिवचली गेल्यानंतर काँग्रेसने मोदींवरील हल्ला आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे़ सध्या मोदींनी महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांत प्रचारसभांचा धडाका लावला आहे़ मोदींना शह देण्यासाठी आजारी असूनही सोनिया गांधी स्वत: मैदानात उतरल्या आहेत़ काँग्रेसच्या प्रचाराची मदार राहुल गांधी यांच्यावर राहील, असे संकेत प्रारंभी मिळाले होते़ मात्र आता त्यात बदल झाला असून सोनिया गांधी याच पक्षाच्या स्टार प्रचारक राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़
काँगे्रसच्या निशाण्यावर मोदी अन् त्यांचे ‘अच्छे दिन’
By admin | Updated: October 6, 2014 23:30 IST