मिमिक्री म्हणजे विनोदी अभिनय नव्हे
By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST
- सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ : लगीनघाई नाटकाच्या निमित्ताने संवाद
मिमिक्री म्हणजे विनोदी अभिनय नव्हे
- सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ : लगीनघाई नाटकाच्या निमित्ताने संवादनागपूर : मिमिक्री करणे म्हणजे कुणाची तरी नक्कल करणे आहे. विनोदी अभिनय ही मिमिक्री नसते. केवळ अंगविक्षेप करणे आणि अचकट-विचकट भाव व्यक्त करणे म्हणजे अभिनय नाही. परिस्थितीसापेक्षतेने योग्य टायमिंग साधून केलेला पंच आणि त्याच्या जोडीला असणारी देहबोली यातून विनोद निर्माण होतो. त्यामुळे मिमिक्री वेगळी आणि विनोदी अभिनय वेगळा आहे. आपण कधीही मिमिक्रीच्या वाटेलाही गेलो नाही आणि जाण्याची गरजही वाटत नाही, असे मत सुप्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ यांनी व्यक्त केले. लगीनघाई नाटकाच्या निमित्ताने नागपुरात आले असता संवाद साधताना ते बोलत होते. बालपणापासूनच माझ्यात अभिनयाचा गुण होता. ज्येष्ठ अभिनेत्यांच्या अभिनयाचा प्रभावही शालेय जीवनात आपल्या आवडीनुसार होत असतो. त्यात माझे मामा रंगकर्मी असल्याने त्यांच्याकडूनही प्रेरणा मिळाली आणि अभिनेता झालो. मामा गोविंदराव सावकार यांची कलामंदिर संस्था होती. त्यांच्यासह अनेक रंगकर्मी घरी यायचे. त्यांच्या गप्पा ऐकताना मलाही नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली. घरात सतत नाटकाचे वातावरण असायचे यातून माझ्या मनावर हा संस्कार होत गेला. संगीत नाटक ते गद्य नाट्यांच्या काळाचा मी दुवा ठरलो. रंगमंचावर स्लॅपसीप हा विनोदाचा प्रकार मी आणला. विनोदाला मोजमाप असते पण हल्ली ते राहिलेले नाही. संहितांचा अभाव आणि तंत्रज्ञानाच्या अतिरेकी उपयोगाने नाटक हरवत आहे. पण नाटक म्हणजे दमदार संहिताच असते, असे ते म्हणाले. अभिनय शिकून येत नाही, तो अंगभूत असावा लागतो. त्याला पैलू पाडता येणे शक्य आहे पण मूलत: अभिनयाचा गुण कलावंताजवळ असायला हवा. मी आजही नव्याने काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. अभ्यास, निरीक्षण, कल्पनाशक्ती आणि विचार यांचे मिश्रण म्हणचे अभिनय असतो. एफटीआयच्या राजकारणात आपल्याला कु ठलाही रस नाही. शिक्षकांच्या, संचालकांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे विद्यार्थ्यांचे काम नाही. आपल्याला सगळे मामा म्हणतात पण त्यात आदर आहे. त्यामुळेच मी हे माझे टोपणनाव स्वीकारले, असे मत अशोक सराफ यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केले.