ऑनलाइन टीम
जम्मू, दि. २७ - जम्मू-काश्मीर येथे भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळून झालेल्या अपघातात रघू बन्सी या वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. अनंतनाग जिल्ह्यामधील बिजबेहरा या ठिकाणी मंगळवारी सकाळी हे विमान कोसळले.
नियमित सरावासाठी मिग-२१ ने मंगळवारी सकाळी श्रीनगरमधील हवाई दलाच्या विमानतळावरून उड्डाण केले. मात्र काही वेळातच ते खाली कोसळले व वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताचे वृत्त कळताच हवाई दलाच्या अधिका-यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.