प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामधील सेक्टर १९ मध्ये भीषण आग लागली असून अनेक टेंट जळून खाक झाले आहेत. जेवण बनवत असताना सिलेंडर फुटल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महाकुंभमेळ्यातील शास्त्री ब्रिज सेक्टर १९ मध्ये ही आग लागली आहे. आगीमुळे आजुबाजुच्या भागात काळ्या धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. अग्निशमन दलाने संपूर्ण परिसर रिकामा करण्यास लावला असून ट्रेनमधून जाणाऱ्या प्रवाशांनी आगीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
हवेचा वेग जास्त असल्याने ही आग इतर भागातही पसरली आहे. अद्याप जिवीतहानीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. या आगीने आता सेक्टर २० मध्येही काही टेंट भस्मसात केल्याचे समजते आहे.