ऑनलाइन लोकमत वाराणसी, दि. २ - सौदीत कामासाठी गेलेल्या एका भारतीय कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहातील अनेक अवयव गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.गाझीपूर जिल्हयातील हर्सारपूर गावातील रामदीन राजभर हा २०१३ साली कामानिमित्त सौदी अरबीयाला गेला होता. त्याला अल खाफजी टाऊन येथे मजूर म्हणून काम मिळाले. परंतू सात महिन्यानंतर ३० एप्रिल २०१४ रोजी त्याने आपल्या पत्नीला व इतर नातेवाईकांना फोन करुन आपल्या जीवाला धोका असून कामावर ठेवणारा मालक आपल्याला जीवे मारुन टाकेन असे फोन करुन सांगितले होते अशी माहिती गाझिपूर जिल्हा पंचायत सदस्य ब्रीजभूषण दुबे यांनी दिली. काही दिवसानंतर रामदीनने गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रामदीनचा मृतदेह फेब्रुवारी महिन्यात सौदीहून भारतात आणला गेला. नातेवाईकांच्या दबावानंतर रामदीनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीएचयूमध्ये तीन सदस्यीय डॉक्टरांच्या टीमने रामदीनचे शवविच्छेदन केले तेव्हा रामदीनच्या मृतदेहातील अनेक अवयव गायब असल्याचे डॉक्टरांनी आपल्या अहवालात म्हटले. यामध्ये किडनी, स्प्लीन आणि अन्य काही महत्वाची अवयवे गायब होती. रामदीनच्या मागे पत्नी शिला व तीन मुले असून रामदीनच्या पत्नीला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, मुख्यमंत्री, एनएचआरसी यांना पत्र पाठविले असल्याची माहिती ब्रीजभूषण दुबे यांनी दिली.
सौदीहून परतलेल्या भारतीय मृतदेहातील अनेक अवयव गायब
By admin | Updated: April 2, 2015 18:16 IST