ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार करण्यात आला असून मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू, जेपी नड्डा आणि विरेंद्र सिंह यांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. आज एकूण २१ नवीन चेह-यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून यामध्ये १७ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील भाजपा खासदार हंसराज आहिर आणि सुरेश प्रभू या दोघांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या पाच महिन्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला. रविवारी दिल्लीत नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षण किंवा गृहमंत्रालय दिले जाण्याची शक्यता आहे. तर सुरेश प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालय दिले जाण्याची शक्यता आहे. रविवारी झालेल्या विस्तारानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील एकूर्ण मंत्र्यांची संख्या ६६ ऐवढी झाली आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आयत्या वेळी माघार घेतल्याने रविवारी २१ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
टीम मोदीतील नवीन मंत्री
कॅबिनेट मंत्री - मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू, जेपी नड्डा आणि विरेंद्र सिंह
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) - बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, डॉ. महेश शर्मा
केंद्रीय राज्यमंत्री - मुख्तार अब्बास नकवी, रामकृपाल यादव, हरीभाई चौधरी, प्रा. सावरलाल जाट, मोहनलाल कुंदारीया, गिरीराज सिंह, हंसराज आहिर, रामशंकर कठेरिया, वाय. एस. चौधरी ( तेलगू देसम पक्षाचे राज्यसभेतील खासदार), जयंत सिन्हा, डॉ. राज्यवर्धन सिंह राठोड, बाबूल सुप्रीयो, साध्वी निरंजन ज्योती, विजय सापला.