ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १५ - कन्नड भाषेत न बोलणा-या मणिपूरच्या तरुणावर बंगळुरुमध्ये अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. कन्नड भाषेत बोलायचे नसेल तर बंगळुरुतून निघून जा अशी धमकी हल्लेखोरांनी या तरुणाला दिली आहे.
मुळचा मणिपूरचा राहणारा टी. मायकल हा सध्या कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. मंगळवारी रात्री मायकल आणि त्याचे अन्य मणिपूरी मित्र एका हॉटेलमध्ये गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. 'तुम्ही बंगळुरुत राहता, कर्नाटकी पदार्थ खाता, मग तुम्ही कन्नड भाषेतच बोलायला हवे' असे हल्लेखोरांनी मायकलला सांगितले. आमच्यावर कोणी हल्ला केला हे आम्हाला माहित नाही पण हल्लेखोर मद्यधूंद अवस्थेत होते असे मायकलने सांगितले. याप्रकरमी बंगळुरुतील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी तिघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे.