दिलीप तिखिले, कोलकाता
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निवासस्थान असलेल्या कोलकातातील ३० बी, हरिश चटर्जी स्ट्रिट भागाला सध्या छावणीचे स्वरूप आले आहे. मुख्यमंत्री या नात्याने नेहमीची असलेली सुरक्षाव्यवस्था निवडणुकीच्या निमित्ताने चार पटीने अधिक वाढविण्यात आली, त्यामुळे या भागात राहणार्या नागरिकांना दैनंदिन व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरी येणार्या पाहुण्यांना तर मोठ्या दिव्यातून जावे लागते. हरिश चटर्जी स्ट्रीट या मुख्य रस्त्यावरुन आतमध्ये एक गल्लीवजा रस्ता जातो. सुमारे दोनशे मीटर आत गेले की, डाव्या बाजुला ममतांचे लहानशे घर आहे. दोनशे मीटरचे हे अंतर पार करताना रस्त्यावरील दोन सुक्षा बुथ आणि घरासमोरील दोन बुथ अशा चार बुथवरील सुरक्षा रक्षकांची नजर तुमच्यावर असते. रस्त्यात कोणी मध्ये घुटमळले तर या चारपैकी एका बुथवरून सुरक्षा रक्षक तुमच्याजवळ येऊन विचारपूस करतो आणि तेथून बाहेर पडण्यास सांगतो. घरासमोर सर्वत्र बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. एका लहान सुरक्षा चौकीत तुमची आणि सामानाची तपासणी केल्यानंतर तुम्हाला दिदींच्या आवारात प्रवेश मिळतो. येथील एका सुरक्षा अधिकार्याशी चर्चा केली असता तो म्हणाला अशा अडचणीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात अनेक अडचणी येतात. या भागात सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार चालत असतात. सर्वच प्रकारचे व्यवसाय या भागात आहे त्यामुळे नेहमीच वर्दळ असते. अशावेळी चावीसही तास लक्ष पुरविणे कठीण काम आहे. ममता बॅनर्जींच्या याच निवासस्थानावरून सध्या राज्यात वादळ उठले आहे. बॅनर्जी राहतात त्या आजुबाजुच्या परिसरात त्यांच्या भावाच्या व भावजयीच्या नावावर मोठी मालमत्ता घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. हरिश चटर्जी स्ट्रिटवर येथूनच ममता बॅनर्जी यांच्या अभूतपूर्व सुरक्षा कड्याला सुरुवात होते. प. बंगाल पोलीस दलातील हे चिलखती वाहन आणि सहा जवान चाविसही तास खड्या पहार्यावर असतात. हा रस्ता ओलांडून पलिकडे गेले की ‘ममता गली’ सुरु होते. परिसरातील टपरीवाल्यांनी या रस्त्याचे नामकरण ‘ममता गली’ असे केले.