लखनौ : रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते महंत भास्कर दास यांचे शनिवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. महंत भास्कर दास हे निर्मोही आखाड्याचे सरपंच महंत (प्रमुख) होते. त्यांच्या मृत्यूमुळे या खटल्यातील हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांचे याचिकाकर्ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. या खटल्यातील सर्वांत जुने याचिकाकर्ते हाशिम अन्सारी यांचे जुलै २०१६ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. अन्सारी व भास्कर दास हे रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यात परस्परांच्या विरोधात लढाई लढत होते, तरी त्यांचे वैयक्तिक संबंध मैत्रीपूर्ण होते. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या भास्कर दास यांना बुधवारी रुग्णालयात दाखलकेले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (वृत्तसंस्था)खटला सुरूच राहणारअलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात ३० सप्टेंबर २०१० रोजी निर्णय दिला होता. त्याविरुद्ध महंत भास्कर दास यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून रामजन्मभूमीच्या संपूर्ण जागेवर दावा सांगितला होता. हा खटला सर्वोच्च न्यायालयात अजूनही सुरू आहे. भास्कर दास यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य राम दास हा खटला पुढे चालविण्याची शक्यता आहे.
रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील मुख्य याचिकाकर्ते महंत भास्कर दास यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:49 IST