Maha Kumbh Stampede : प्रयागराज : महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येला अमृत स्नान करण्यासाठी संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक आले. यावेळी झालेल्या गर्दीमुळे याठिकाणी लावण्याते आलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर १० भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही.
आज (बुधवार) महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येचे अमृत स्नान आहे. यानिमित्त मोठ्या संख्येने संगमावर लोक आले. यावेळी संगम किनाऱ्यावर रात्री २ वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यावेळी याठिकाणी लावण्याते आलेले बॅरिकेड्स तुटले आणि काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि लोक इकडे तिकडे धावू लागले. अनेक भाविकांचे सामान खाली पडले, ज्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.
या घटनेबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, "आम्ही आरामात जात होतो, तेव्हा अचानक गर्दी झाली आणि बॅरिकेड्स तुटले. यावेळी धक्काबुक्की आणि हाणामारी सुरू झाली. आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नव्हता. सगळे इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होते. अनेक लोक जखमी झाले आहेत. अशी स्थिती निर्माण झाली की, काय चाललंय ते कळत नव्हते."
दुसरीकडे, प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्याच्या अधिकारी आकांक्षा राणा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "त्रिवेणी संगमाजवळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. काही बॅरिअर्स तुटले. काही लोक जखमी झाले आहेत. कोणाचीही स्थिती गंभीर नसून त्यांना योग्य ते उपचार देण्यात येत आहेत."
दरम्यान, चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलीस, निमलष्करी दल आणि अग्निशमन दलाच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. संगम परिसरात अग्निशमन दलाचे ऑल-टेरेन वाहन आधीच घटनास्थळी होते. ज्याच्या मदतीने अनेक जखमींना बाहेर काढण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी (सीएफओ) भारतेंदु जोशी म्हणाले की, घटनेच्या वेळी हे वाहन घटनास्थळी होते, त्यामुळे मदतकार्य जलद गतीने सुरू करण्यात आले. या वाहनाच्या मदतीने एका मुलीला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले.
या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना याठिकाणी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकांद्वारे महाकुंभ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच १० भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून आखाडा परिषदेने अमृत स्नान पुढे ढकलले आहे.
दरम्यान, प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर येत आहेत. सरकारचा अंदाज आहे की, यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला ४० कोटीहून अधिक लोक भेट देणार आहेत.