मलिक यांची मात्र अद्याप बदली नाही
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राजधानीतील वादग्रस्त निवासी आयुक्त बीपिन मलिक यांची बदली न करता त्यांचा कार्यभार शुक्रवारी महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक व राजशिष्टाचार विभागाचे सचिव म्हणून रूजू झालेल्या लोकेश चंद्र यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
मलिक हे सध्या प्रशिक्षणासाठी लंडनला गेलेले आहेत. तेथून परतल्यावर पुन्हा अमेरिकेला जाणार असल्याने आता मलिक यांचा पदभार काही महिने चंद्र यांच्याकडे राहणार आहे. त्यातच मलिक आता निवासी आयुक्त म्हणून काम पाहण्याची शक्यता कमी झाली. ते साडेतीन वर्षापासून या पदावर आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे त्यांना सहकार्य मिळाले होते. आता या दोन्ही बाबी त्यांच्या बाजूने नाहीत. सदनातील गैरसोयी व शिवसेना खासदारांचे आंदोलन व त्यानंतरचे चपाती प्रकरण हे सारेच मलिक यांना प्रतिकूल ठरले. लोकेशचंद्र रूजू झालेले पद एक वर्षापासून रिक्त होते. लोकेशचंद्र हे भारतीय प्रशासन सेवेच्या 1993 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र सदन येथे रूजू होण्यापूर्वी ते वाणिज्य मंत्रलयात सहसचिव होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भंडारा, गोंदिया व नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. नागपूर महापालिकेचे ते आयुक्तही होते. (विशेष प्रतिनिधी)