ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना संसदीय मंडळामधून वगळण्यात आले असून त्यांना नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मार्गदर्शक मंडळामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी आडवाणी व जोशी यांची रवानगी ओल्ड एज होममध्ये किंवा वृद्धाश्रमात करण्यात आल्याची टीका केली आहे.
मार्गदर्शक मंडळामध्ये बसून पक्षात काय चाललंय ते मूकपणे बघण्याचे काम असल्याने हे मूकदर्शक मंडळ असल्याची टीकाही अल्वी यांनी केली आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते अशी टीका कुणी मनावर घेऊ नये म्हणूनच मार्गदर्शक मंडळामध्ये नरेंद्र मोदी व राजनाथ सिंह यांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मार्गदर्शक मंडळ खरंच काही मार्गदर्शन करेल का, त्याचा अमित शाह व अन्य नेते विचार करतील का किंवा मार्गदर्शक मंडळ केवळ एक मूकमंडळ असेल याची प्रचिती काही काळानंतरच येईल.