जमीन हडपणाऱ्याला जामीन नाकारला
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एका ट्रस्टची जमीन हडपणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.
जमीन हडपणाऱ्याला जामीन नाकारला
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी एका ट्रस्टची जमीन हडपणाऱ्या आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.रंजन तिमोथी असे आरोपीचे नाव असून, तो हजारीपहाड येथील रहिवासी आहे. ७ ऑगस्ट २०१४ रोजी कळमेश्वर पोलिसांनी तिमोथीसह अन्य आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४१९, ४२३, ४७१, ४७३, ४२०, ४६७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. एकटा तिमोथी बाहेर असून, उर्वरित आरोपींना अटक झाली आहे. नागपुरातील अंजुमन हमी-ए-इस्लाम ट्रस्टची कळमेश्वर तालुक्यातील कारली येथे १०.३२ हेक्टर जमीन आहे. २००३ मध्ये तिमोथीने ट्रस्टच्या काही कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बनावट कागदपत्र तयार करून जमीन परस्पर विकली होती. सत्र न्यायालयाने गेल्या २३ डिसेंबर रोजी तिमोथीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.आरोपीचा जामीन अर्ज मागेउच्च न्यायालयाने मंगळवारी हत्याप्रकरणातील आरोपी शेखर अंबुलकरला जामीन देण्यास नकार दिला. यामुळे आरोपीने संबंधित अर्ज मागे घेतला. आरोपी इंदिरानगर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. गेल्या १४ जानेवारी रोजी शेखर व त्याच्या साथीदारांनी जुन्या शत्रुत्वातून पप्पू काळेची हत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सत्र न्यायालयाने १४ ऑक्टोबर २०१४ रोजी शेखरचा जामीन अर्ज खारीज केला होता. दोन्ही प्रकरणांत शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एम. जे. खान यांनी बाजू मांडली.