लोकमत ऑनलाइन
बुलंदशहर, दि. ०६ - मॅगीत मर्यादेपेक्षा जास्त शिशाचे प्रमाण आढऴून आल्यानंतर भारतातील विविध राज्यात मॅगी विक्रीवर बंदी घातल्याची घटना ताजी असताना, येथील एका ग्लुकॉन-डी या एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये आळ्या सापडल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका बबलू नावच्या व्यक्तीने जनरल स्टोअर्समधून ग्लुकॉन-डी हे एनर्जी ड्रिंक विकत घेतले. घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी ग्लुकॉन-डीचे सेवन केल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या विकत घेतलेल्या ग्लुकॉन-डी पॅकेटची व्यवस्थित तपासणी केल्यानंतर त्या पॅकेटमध्ये आळा असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बबलू यांनी येथील ड्रग सेफ्टी ऑफिसरकडे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी या जनरल स्टोअर्समधून ग्लुकॉन-डीचे चार पॅकेट्स घेतले असून ते तपासणीसाठी लखनऊ येथील एका प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यामध्ये ग्लुकॉन-डीचे पॅकेट्स सदोष आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे ड्रग सेफ्टी ऑफिसर शिवादास यांनी सांगितले.