ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - नायब राज्यपाल नजीब जंग हे भाजपाचे पोलिंग एजंट आहेत, या अरविंद केजरीवालांच्या टीकेला भाजपाने चोख प्रत्युत्तर देत 'केजरीवाल यांची भाषा सी-ग्रेड चित्रपटाच्या खलनायकासारखी आहे' अशी टीका केली आहे. केजरीवाल व जंग यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी जंग यांच्यावर टीका करत ते भाजपाचे एजंट असल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे भडकलेल्या भाजपाने केजरीवालांवरच टीकास्त्र सोडले आहे. 'ते (केजरीवाल) वापरत असलेली भाषा अतिशय चुकीची असून त्यांच्यावर सी-ग्रेड चित्रपटातील व्हिलनच्या भाषेचा प्रभाव जाणवतो' अशी टीका दिल्ली भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केली आहे.
दरम्यान नजीब जंग यांनीही केजरीवालांना चोख उत्तर दिले आहे. 'परमेश्वरा, केजरीवालांना ते वापरत असेल्या भाषेची जाणीव नाही, त्यांना माप कर', असे जंग यांनी म्हटले आहे. तर माजी आयपीएस अधिकारी व केजरीवाल यांच्या माजी सहकारी असलेल्या किरण बेदींनीही त्यांच्या भाषेवर आक्षेप नोंदवला आहे.