नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील सत्तासंघर्ष मंगळवारी पुन्हा उफाळून आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) बिहारमधील पाच अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याच्या आम आदमी पार्टी (आप) सरकारच्या निर्णयावर नायब राज्यपालांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर दिल्ली सरकारने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.त्याचे झाले असे की, आप सरकारतर्फे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या कार्यालयाला विनंती करण्यात आल्यानंतर बिहार पोलीस विभागातील तीन निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक दिल्लीच्या एसीबीत सामील झाले आणि येथेच वादाची ठिणगी पडली. नायब राज्यपालांनी आप सरकारच्या या निर्णयावर कठोर पवित्रा घेत तडकाफडकी या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नायब राज्यपालांच्या प्रत्यक्ष अधिकार व नियंत्रणात असल्याचे ठासून सांगितले. विशेष म्हणजे केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपालांदरम्यान अधिकार क्षेत्रावरून युद्ध पेटले असताना या नियुक्त्या झाल्या आहेत.एसीबी, दिल्ली एका पोलीस ठाण्याच्या रूपात नायब राज्यपालांच्या नियंत्रणात आणि देखरेखीखाली कार्यरत आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेतही (संख्या १३६८ ई) हे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना बिहार पोलिसांच्या नियुक्तीशी संबंधित कुठलाही प्रस्ताव अद्याप नायब राज्यपालांकडे आलेला नाही. दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाकडून असा प्रस्ताव आल्यास त्याचे संपूर्ण अध्ययन केले जाईल, असे जंग यांच्या कार्यालयातून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)