ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २८ - नरेंद्र मोदींच्या सरकारमधील पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. या मुद्यावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या ट्विटला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सडेतोड उत्तर मिळाले आहे. 'अनुच्छेद ३७० राहो अथवा न राहो, जम्मू-काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे व यापुढेही राहील' असे खडसावत संघाचे नेते राम माधव यांनी ओमर यांना प्रत्युत्तर दिले.
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७0 अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेण्याच्या मुद्दय़ावर चर्चा करायला नवे सरकार तयार आहे, असे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी म्हटले होते. काश्मीर मुख्य भारतीय प्रवाहात येण्यात अनुच्छेद ३७0 हा भौतिक अडसराहून मानसिक अडसर जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले होते. सिंह यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी, एक तर अनुच्छेद ३७0 तरी राहील नाहीतर काश्मीर तरी भारतात राहील, अशी गर्भित धमकी दिली होती.
संघाचे नेते राम माधव यांनी ट्विटरद्वारे या मुद्यावर सडेतोड मत मांडले. ' कलम ३७० राहो वा न राहो, जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे आणि नेहमीच राहील. काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची धमकी देणारे ओमर या राज्याला स्वत:ची खासगी संपत्ती समजतात का,' असा खडा सवालही माधव यांनी ट्विटरवर विचारला आहे.
अनुच्छेद ३७0 हा भारत व जम्मू-काश्मीर यांच्यातील एकमेव संवैधानिक दुवा आहे. हा अनुच्छेद रद्द करण्याची भाषा करणे हे केवल असमंजसपणाचेच नव्हे तर बेजबाबदारपणाचेही आहे. मोदी सरकार विस्मृतीत जाण्याच्या बर्याच आधी एक तर जम्मू-काश्मीर तरी भारतात राहणार नाही किंवा अनुच्छेद ३७0 तरी कायम राहील, असे ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केले होते.