बेंगळुरू : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती (82 वर्ष) यांचे विविध आजारांनी प्रकृतीची गुंतागुंत वाढल्याने शुक्रवारी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. अनंतमूर्ती यांनी कन्नड साहित्यात वेगळ्या वाटा चोखाळत या भाषेला वेगळी उंची प्राप्त करून दिली.
साहित्य अकादमीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी व विविध क्षेत्रंतील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले. ताप आणि संसर्ग यामुळे त्यांना दहा दिवसांपूर्वी त्यांना मणीपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी 6.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी इस्थेर, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असता त्यांच्यावर उपचाराचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले, असे या रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले. गेल्या काही वर्षापूवी मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांच्यावर डायलिसीस सुरू होते.