ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ६ - बेहिशोबी संपत्तीप्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या १२ हजार खासगी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. जयललिता यांना अटक झाल्याने अनेकांना धक्का बसला असून त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे आले आहेत. जयललिता यांना तमिळ सिनेस्टार्सचाही पाठिंबा मिळाला असून त्यांच्या काही कट्टर समर्थकांनी तर आत्महत्याही केल्या आहेत.
जयललिता यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी या मागणीसाठी तामिळनाडूमधील १२ हजार खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा संस्थाचालकांनी रविवारी घेतला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी तामिळनाडूमधील तब्बल १२ हजार शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा संस्थाचालकांनी घेतलेल्या या निर्णयामध्ये अण्णा विद्यापीठातील ५०० खासगी इंजिनिअरींग कॉलेजही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जयललिता यांची तात्काळ सुटका करण्यात यावी यासाठी चेन्नईसह अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची आंदोलने सुरू आहेत.