ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २३ - अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा ६७ वर्षीय जयललिता यांनी आज पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या त्यांना निर्दोष सोडणाऱ्या निकालाने त्यांचा मुख्यमंत्रिपदी परतण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता आणि काल तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी राजीनामा देऊन जयललितांचा उरलेला मार्ग मोकळा करून दिला. आज सकाळी मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात हा शपथविधी पार पडला. या सोहळ्यासाठी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत हेही उपस्थित होते. तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी मंत्रीमंडळातील २८ जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे, जल्लोषाचे वातावरण पहायला मिळाले.
बेहिशोबी बेहिशेबी संपत्तीप्रकरणी जयललिता यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे गेल्यावर्षी २९ सप्टेंबर रोजी पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने याप्रकरणी जयललितांना ११ मे रोजी निर्दोष ठरवले आणि त्यांचा पुन्हा एकदा तमिळनाडुच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला