ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरलेल्या व चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना अखेर अंतरिम जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या समर्थकांनी चार दिवस आधीच दिवाळी साजरी करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने जयललितांना १८ डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला असून शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे. यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता.
बंगळुरू विशेष न्यायालयाने अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवत त्यांना ४ वर्षे तुरुंगावासाची तसेच १०० कोटी रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. याप्रकरणी जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर जयललिता यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली व तेथे अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान जयललिता यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जामीन देण्यात आला असून १८ डिसेंबरपर्यंत त्यांना घराबाहेर पडता येणार नाही. तामिळनाडूमध्ये हिंसा होणार नाही, न्यायाधीशांवर कोणतीही टिपण्णी होणार नाही, याची त्यांना हमी द्यावी लागेल. तसेच खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयात जमा करावी लागतील या तीन अटी सर्वोच्च न्यायालयाने घातल्या आहेत, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले.