चंदीगड : फेसबुक अथवा इतर कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटस्वर अश्लील चित्रे (पॉर्न) बघू नका आणि अज्ञात लोकांच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ कदापि स्वीकारू नका, असे निर्देश लष्कराने आपले जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहेत. भारतीय लष्करातील अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाचा वापर करताना कुठली काळजी घ्यायची यासंदर्भातील एक नियमावलीच जारी करण्यात आली असून त्याचे काटेकोर पालन करण्यास सांगण्यात आले आहे.हवाई दलातील एअरमन रणजित के.के. याला गेल्या २८ डिसेंबरला फेसबुकवर एका सुस्वरूप महिलेस भारतातील संवेदनशिल तळांची गोपनीय माहिती पुरविल्याबद्दल भटिंडा येथे अटक करण्यात आली होती. ही महिला इंग्लंडमधील पत्रकार असल्याचा रणजितचा समज झाला होता. परंतु प्रत्यक्षात ती एका परकीय गुप्तचर संस्थेची हेर होती. त्यानंतर लागलीच ३१ तारखेला हा फतवा काढण्यात आला असून फेसबुकवरील एखादे अश्लील छायाचित्र म्हणजे लष्कराची संवेदनशिल माहिती मिळविण्यासाठी रचण्यात आलेला सापळा असू शकतो असा धोक्याचा इशारा यात देण्यात आला आहे. जवानांना व्हॉटस्अॅपवर आपल्या प्रोफाईलमध्ये त्यांचे गणवेशातील छायाचित्र तसेच देशातील तळ आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित छायाचित्रे आॅनलाईनवर न टाकण्याची ताकीद देण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
जवानांनो! ‘पॉर्न’च्या मोहात पडू नका!
By admin | Updated: January 5, 2016 08:48 IST