हरीश गुप्ता - नवी दिल्लीभाजपच्या नेत्यांनी जम्मू-काश्मिरात सरकार स्थापण्यासाठी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेत हालचालींना वेग दिला असला तरी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी परिस्थिती अस्थिर असल्याची कबुली दिली आहे.नववर्षानिमित्त अर्थमंत्री अरुण जेटली यांनी निवडक पत्रकारांना दिल्लीत दिलेल्या मेजवानीच्यावेळी शहा यांनी या राज्यात लवकरच लोकप्रिय सरकार स्थापन होण्याची आशाही व्यक्त केली. ८७ सदस्यीय विधानसभेत पीडीपीचे २८ आमदार असून या पक्षाला भाजप (२५) आणि काँग्रेस (१२) या दोन्ही पक्षांचे समर्थन घ्यावे लागेल. तसे केल्यास राज्यातील जम्मू, लडाख आणि काश्मीर खोरे या तीनही भागांना प्रतिनिधित्व मिळेल असा युक्तिवादही या पक्षाने केला आहे. त्यातून नॅशनल कॉन्फरन्सला सत्तेबाहेर ठेवण्याचा पीडीपीचा उद्देशही साध्य होऊ शकेल. संपूर्ण सहा वर्षांसाठी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वात किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार चालविले जावे असे पीडीपीला वाटते. याच कारणामुळे भाजपाने सत्तेसाठी दावा न करता केवळ मुदत मागितली आहे. भाजपाने कोणत्या पक्षासोबत चर्चा सुरू आहे त्याचे नावही गुलदस्त्यात ठेवले आहे.मेहबुबांची गुगली... पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रशंसा करतानाच मोदींवर या राज्याबाबत मोठी जबाबदारी असल्याचे सांगत गुगली टाकली आहे. वाजपेयींएवढेच मोदी हेही महनीय व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत त्यांनी मोदींनाही तेवढेच महत्त्व देत असल्याचे स्पष्ट केले. भाजपाचे सर्व २५ आमदार जम्मू भागातील असून मुफ्तींना समर्थन देण्याऐवजी विरोधात बसण्याची भाजपाची मन:स्थिती नाही.गोळाबेरीज सुरूसरकार स्थापण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत मुदत असल्यामुळे भाजपाला कोणतीही घाई नाही. सरकार अस्तित्वात न आल्यास राज्यपाल राजवटीच्या पर्यायावर विचार करावा लागेल. पीडीपीने ५५ आमदारांच्या समर्थनाचा दावा केला असला तरी या संख्याबळाबाबत विवरण दिलेले नाही. या पक्षाने भाजपाची साथ मिळविल्यास एकूण संख्याबळ ५५ एवढे होईल. मनोरंजक म्हणजे म्हणजे पीडीपीने काँग्रेस (१२) आणि नॅशनल कॉन्फरन्स (१५) या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले तरी संख्याबळ ५५ एवढेच राहील. (वृत्तसंस्था)