नवी दिल्ली : विविध क्षेत्रांतील महिलांनी लैंगिक शोषणाला मी टू मोहिमेद्वारे जी वाचा फोडली आहे, ती योग्यच असून, आपला त्याला पूर्ण पाठिंबा आहे, असे प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांनी जाहीर केले आहे.या विषयावर ते प्रथमच बोलले आहेत. ते म्हणाले की, मी अनेक दिवसांपासून मी टू मोहिमेकडे बारकाईने पाहत आहे. त्यात ज्यांची नावे आली आहेत, ती पाहून मला मोठाच धक्का बसला आहे. इतर क्षेत्रे आणि चित्रपटसृष्टीही अतिशय स्वच्छ राहायला हवी. महिलांचा सन्मान चित्रपटसृष्टीत व्हायलाच हवा. जे होत आहे, ते अतिशय वाईट आहे.या क्षेत्रातील प्रत्येकाला आपण व आपले सहकारी सुरक्षित आहेत, असे वाटणे गरजेचे आहे. तसे वातावरण निर्माण करायला हवे. किंबहुना त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे सांगून ए. आर. रहमान म्हणाले की, सोशल मीडियावरून सुरू झालेली मोहीम योग्यच आहे; पण त्याचा न्याय सोशल मीडियावरून मिळू शकणार नाही आणि तिथून तो देण्याचा प्रयत्नही करू नये. न्याय देण्याचे सोशल मीडिया हे ठिकाण असू शकतनाही.
#MeToo: ‘मी टू’ मोहिमेला आपला पाठिंबाच, काहींची नावे वाचून धक्काच बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 04:05 IST