निपाणीच्या पाणी योजनेची चौकशी पावणेदोन कोटींची योजना : पंचायत समितीसमोर धरणे
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
श्रीरामपूर : निपाणी वडगाव येथील पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामाची चौकशी करण्याचे आदेश बुधवारी श्रीरामपूर पंचायत समितीच्या अधिकार्यांनी दिले.
निपाणीच्या पाणी योजनेची चौकशी पावणेदोन कोटींची योजना : पंचायत समितीसमोर धरणे
श्रीरामपूर : निपाणी वडगाव येथील पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतील कामाची चौकशी करण्याचे आदेश बुधवारी श्रीरामपूर पंचायत समितीच्या अधिकार्यांनी दिले.भाजपचे विठ्ठल राऊत, सुनील घोरपडे, अनिल उंडे, हरिभाऊ राऊत, बाळासाहेब गायधने, संतोष राऊत यांच्यासह राजा वीरभद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल फक्कड यांनी या कामातील गैरव्यवहार व दर्जाबाबत गटविकास अधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली होती. अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता निकृष्ट दर्जाचे काम करुन ग्रामस्थांची फसवणूक करण्यात आली. नवीन जलवाहिनी न टाकता जुन्या पाईपांचा वापर करुन गैरकारभार करण्यात आला. योजनेच्या निकषांचा बोजवारा उडाला. विहिरीपासून ते पाण्याच्या टाक्यांपर्यंत जलवाहिनी ४ फूट खोदाई करून टाकणे आवश्यक असताना तशी खोदाई न करता काम न केल्यामुळे जलवाहिनी पाण्याच्या दाबामुळे फुटत आहे. काही ठिकाणी विहिरीपासून ते रेल्वे चौक, जोशी वस्तीपर्यंत एकाच खोदाईतून दोन जलवाहिनी टाकून खोदकामाची वेगवेगळी बिले काढून भ्रष्टाचार केल्याचा आरोप २० फेब्रुवारीस निवेदनाद्वारे करण्यात आला होता. त्याची दखल न घेतल्याने बुधवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र पंडुरे यांनी या तक्रारींची दखल घेऊन निपाणी वडगावच्या राष्ट्रीय पेयजल योजनेची १५ दिवसात संपूर्ण चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)