नवी दिल्ली : ब्रिटिशांविरुद्ध लढताना आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी आंदोलने करताना काँग्रेसला जितक्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या आणि संघर्ष करावा लागला, त्याहून स्वातंत्र्यानंतर भाजपाला संघर्ष करावा लागला आहे, असे बेजबाबदार विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि त्यात सहभागी झालेल्या लाखो लोकांचा अपमान केला आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसने केली आहे. स्वातंत्र्य लढ्यात भारतीय जनता पार्टी, जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा संघ परिवारातील कोणतीही संघटना वा व्यक्ती यांचा सहभाग नव्हता. किंबहुना ते त्या काळात ब्रिटिशांना मदत करीत होते, हे देशातील जनता कधी विसरणार नाही, असेही काँग्रेसने म्हटले आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व काँग्रेसनेच केले होते आणि काँग्रेसचे सारे नेते त्यात सहभागी झाले होते. त्याबद्दल अनेकांना हजारो नेते व कार्यकर्ते यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि अनेक अन्याय व अत्याचार यांना सामोरे जावे लागले. संघ परिवाराला व मोदींना भारताचा हा इतिहास अजिबातच माहीत नाही. त्यामुळेच त्यांनी बेजबाबदार वक्तव्य करून स्वातंत्र्य लढ्याचा, काँग्रेसचा आणि देशातील सामान्य जनतेचा अपबमान केला आहे,असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)- भाजपा, जनसंघ वा संघ परिवार स्वातंत्र्य लढ्यात नव्हता आणि त्यांना ब्रिटिश राजवटीत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कोणत्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागलेल्या नाहीत. येनकेन प्रकारेण सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजपा आणि त्याचे नेते करीत राहिले. त्याला संघर्ष म्हणणे चुकीचे आहे. राजकीय स्वार्थासाठीचे प्रयत्न हे संघर्ष ठरू शकत नाहीत, असे सांगून रणदीप सुरजेवाला म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात जाणूनबुजून सहभागी न झालेल्यांनी त्या लढ्याचा अपमान करणे दुर्देवी आहे. भाजपा नेत्यांना देशाचा इतिहास माहीत नसला तरी देशातील जनतेला स्वातंत्र्य सैनिकांचे आणि काँग्रेसचे बलिदान माहीत आहे.
मोदींकडून स्वातंत्र्यलढ्याचा अपमान
By admin | Updated: August 19, 2016 05:22 IST