न्यूयॉर्क : नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला असतानाही भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर नाहीत. दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत अधिक सावध आहेत, असे जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी येथे सांगितले. ‘भारत आणि पाकिस्तान : एक उपखंडीय प्रकरण’ या विषयावरील संमेलनात ते बोलत होते. उपखंडावर युद्धाचे ढग घोंगावत असल्याचे मानणाऱ्यांपैकी मी नाही. आमच्या काही वृत्तवाहिन्या दोन्ही देश युद्धाच्या शक्यतेबाबत सावध असल्याचे पाहू इच्छितात. मला वाटते की, भारत व पाकमधील सरकारे त्याहून कितीतरी अधिक सावध आहेत, असे ते म्हणाले. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या संमेलनाचे आयोजन केले. पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष जन. परवेझ मुशर्रफ हेदेखील या संमेलनात भाषण करणार होते. मात्र, सुरक्षा कारणांमुळे त्यांनी भाषण रद्द केले. अब्दुल्ला यांनी एक तासाच्या चर्चेदरम्यान काश्मीर, भारताचे लक्ष्यभेदी हल्ले, हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वनी, पाकसोबतचा तणाव, काश्मिरी पंडितांची स्थिती तसेच कलम ३७० सह विविध विषयांना हात घातला. (वृत्तसंस्था)...तर दबाव वाढला असता!उरी हल्ल्यानंतर आपण काय केले हे भारत सरकारने अत्यंत सावधपणे सांगितले. लक्ष्यभेदी हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) नियंत्रण रेषेजवळ करण्यात आलेली दहशतवादविरोधी मोहीम होती, असे भारताने जगाला सांगितले. आपले लष्कर ताबा रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मिरात किती दूरपर्यंत गेले आणि या हल्ल्यात किती लोक ठार झाले याची माहिती सरकारने दिली नाही. भारत सरकारने याची माहिती दिली असती तरी पाकचे नवाज शरीफ यांच्यावर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा मोठा दबाव असता. भारत व पाकमधील वाढलेल्या तणावामुळे खोऱ्यात निराशा पसरते. उभय देशांतील संबंधातील तणावाचा इतर कोणत्याही राज्यावर जम्मू आणि काश्मीरएवढा परिणाम होत नाही. काश्मीर ही राजकीय समस्या असून, त्यावर राजकीय तोडगाच काढला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.
भारत-पाक युद्ध असंभव!
By admin | Updated: October 23, 2016 01:21 IST