रघुनाथ पांडे, नवी दिल्लीतिथे तुम्हाला ‘जब वी मेट’ मधील रतलामच्या फलाटावर उभे असलेले करीना आणि शाहिद कपूर दिसतात. करियरच्या सुरुवातीचा शाहरूख भावतो...अछूत कन्या मधील अशोक कुमार, देविका राणी..प्यासामधील गुरुदत्त लक्ष वेधून घेतो..सारेच प्रसंग रेल्वेशी नाते सांगणारे. ही सारी दृश्ये एकत्र जोडली आहेत, ती ‘इम्पॅक्ट आॅफ रेल्वे आॅन इंडियन सिनेमा’ या माहितीपटाने... भारतीय चित्रपटाच्या दुनियेवर रेल्वेचा कसा प्रभाव आहे, हे दाखवण्यासाठी या माहितीपटाची निर्मिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केली आहे. भारतीय चित्रपटाला १०० वर्षे झाल्याने या काळात रेल्वेचा वापर आणि त्यातून प्रेक्षकांना मिळालेला आनंद उत्तरोत्तर वाढतोच आहे, हे मांडण्याचा प्रयत्न माहितीपटातून करण्यात आला आहे. दिग्दर्शक श्याम बेनेगल, ‘शोले’कार रमेश सिप्पी, गदरचे अनिल शर्मा, सुभाष घई, अनुभव सिन्हा, सतीश कौशिक यांनी त्यांच्या चित्रपटातून रेल्वे कशी चितारली त्यावर विश्लेषणात्मक पण रंजन करणारे मत त्यात आहे. सिप्पी रेल्वेशी ऋणानुबंध असल्याचे सांगतात. घईना रेल्वेचा आवाज आवडतो. गदरसाठी वाफेचे इंजिन कसे पाक सीमेवर नेले तो समृद्ध करणारा अनुभव ते सांगतात. ‘भाग मिल्खा भाग’मध्ये मिल्खा रुळावरुन कसे धावला तो दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितलेला प्रसंग शहारे आणतो. प्यार बाटते चलो..हे किशोरकुमार यांनी गायलेले गाणे जुनी याद ताजी करते. आओ बच्चों तुम्हे दिखाये किंवा आओगे जब तुम साजना,अंगना फूल खिले ही गाणी या माहितीपटाचे दिग्दर्शक सतीश पांडे यांनी प्रसंगोपात चपखल बसवली आहेत.‘द ग्लोरियस हिस्ट्री आॅफ़ इंडियन रेलवे’ या भागात ‘हातो की चंद लकीरो को...’हे विधाता सिनेमातील दिलीपकुमार व शम्मी कपूर यांचे गाणे बदलत जाणाऱ्या नशीबाचे प्रतीक म्हणून सांधे बदलणारे रूळ दाखवितात. १६ एप्रिल १८५३ या दिवसाचा बोरीबंदर ते ठाणे हा ग्रेट इंडियन पेननसुला या पहिल्या गाडीचा प्रवास रोमांच उभे करतो. खुशवंत सिंग यांच्या मेमरीज आॅफ पाक या पुस्तकातील माहिती वापरण्यात आली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या ५० बड्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल प्रेक्षागारातील पडद्यावर हा ३० मिनिटांचा माहितीपट आज बघितला.
भारतीय रेल्वेचा भन्नाट माहितीपट
By admin | Updated: December 25, 2014 01:39 IST