India China FaceOff: डोकलाममध्ये पुन्हा संघर्ष पेटणार?; चीनकडून बोगद्याचं काम वेगानं सुरू
By कुणाल गवाणकर | Updated: November 9, 2020 23:28 IST
India China FaceOff: हिवाळ्यात विनाअडथळा सीमेवर पोहोचण्यासाठी चीनच्या वेगवान हालचाली
India China FaceOff: डोकलाममध्ये पुन्हा संघर्ष पेटणार?; चीनकडून बोगद्याचं काम वेगानं सुरू
नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमधील तणाव गेल्या काही महिन्यांपासून वाढला असताना आता डोकलाम परिसरातही संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. चीननं डोकलाममधल्या पठारी भागात रस्त्यांची कामं सुरू केली आहेत. एनडीटीव्हीनं सॅटेलाईट फोटोंचा संदर्भ देऊन याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोणत्याही ऋतूत या भागांत पोहोचता यावं यासाठी चीनकडून बोगद्याचं काम अतिशय वेगानं सुरू आहे.२०१७ मध्ये भारत आणि चीनचं सैन्य डोकलाममध्ये आमनेसामने आलं होतं. त्यामुळे काही आठवडे परिस्थिती अतिशय तणावाची होती. ऑगस्ट २०१९ मध्ये डोकलाममध्ये एक बोगदा तयार करण्यात आला. हा बोगदा मेरूग ला पासमधून जातो. हा बोगदा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या उत्तर मार्गाचा भाग आहे. ऑगस्ट २०१९ आणि ऑक्टोबर २०२० चे फोटो पाहिल्यास या भागात चीननं बोगद्याचं काम अतिशय वेगानं केल्याचं लक्षात येतं.छायाचित्र सौजन्य- एनडीटीव्हीडोकलाममध्ये कोणत्याही अडथळ्यांविना पोहोचण्यासाठी चीन प्रयत्न करत असल्याची माहिती लष्करी अभ्यासकांनी दिली. थंडीच्या दिवसांत या भागांत प्रचंड बर्फवृष्टी होते. त्यामुळे या भागातून वाहतूक करणं आव्हानात्मक होतं. त्यामुळेच चीननं या भागात बोगदा तयार केला आहे. पूर्व लडाखमधील भारत-चीनमधील तणाव निवळलेला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये वारंवार संघर्षाची परिस्थिती निर्माण होत आहे. चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसण्याचेही प्रयत्न केले आहेत.छायाचित्र सौजन्य- एनडीटीव्हीभारत आणि चीनमध्ये जून ते ऑगस्ट २०१७ दरम्यान डोकलाममध्ये संघर्ष निर्माण झाला होता. दोन्ही देशांचे जवान ७० पेक्षा अधिक दिवस आमनेसामने उभे ठाकले होते. सिक्कीम, भूतान आणि चीनच्या सीमावर्ती भागात असलेल्या डोकलामध्ये २०१७ मध्ये कच्चा रस्ता होता. मात्र आता या भागात चीननं पक्का रस्ता तयार केला आहे. चीनकडून असलेला धोका लक्षात घेऊन भारतानंदेखील रस्त्यांच्या कामांना वेग दिला आहे. डोकलाममध्ये फौजफाटा कमी वेळात पोहोचवा, यासाठी भारतानं सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या भागांमध्ये दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यावर विशेष भर दिला आहे.