नवी दिल्ली : भारत आणि चीन मानवतेच्या इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग यांच्या भारत भेटीच्या एक दिवसआधी मोदी यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे.
भारत आणि चीनच्या संबंधांना साध्या गणतीय पद्धतीने समजले जाऊ शकत नाही. कारण त्यांच्यामध्ये एक अनोखे गुणधर्म आहेत. दोघे मिळून संपूर्ण मानवजातीचे भविष्य उज्ज्वल करू शकतात, असे मोदी म्हणाले. ते चीनच्या पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकानुसार पंतप्रधानांनी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध वाढविण्याबद्दल निवेदन केले आहे. त्यात ते म्हणतात, प्रत्येक इंच पुढे सरकत असताना आम्ही मानवतेच्या एतिहासाचे पुनर्लेखन करू शकतो आणि आमचे पुढे पडलेले प्रत्येक पाऊल पृथ्वीला चांगले बनविण्यात मोठे योगदान ठरू शकतो.
भारत आणि चीन एवढे पुढे जातील की, त्यामुळे केवळ आम्ही दोन देशच पुढे जाणार नाही तर संपूर्ण आशिया आणि मानवजात प्रगती आणि सौहार्दतेच्या दिशेने पुढे जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही देशातील लोकसंख्येबद्दल बोलताना ते म्हणाले, भारत आणि चीनला काही फायदा होणो म्हणजे जगातील सुमारे 35 टक्के लोकसंख्येला लाभ होणे आहे. अशाच प्रकारे भारत आणि चीनचे संबंध मजबूत झाल्यास जगातील 35 टक्के नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन येईल.(वृत्तसंस्था)