विजय बाविस्कर - कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात चुरशीच्या लढती झाल्या. किरकोळ अपवाद वगळता कोठेही तणावाचे प्रसंग घडले नाहीत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागाचा मतदानाचा टक्का वाढल्याने एकूण मतदानाची टक्केवारीही वाढली. याचा सर्वाधिक फटका प्रस्थापितांना बसू शकतो. तरुणांचा मतदानात उत्साह असला तरी सुशिक्षित मतदार फारसा घराबाहेर पडला नाही. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघात चौरंगी- पंचरंगी सामने होते. मात्र, या चुरशीचे प्रत्यंतर मतदानात मात्र उमटले नाही. पुणे जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ५५.५३ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या वेळी त्यामध्ये पाच ते सात टक्के वाढ दिसून येत आहे. माजी विधानसभा अध्यक्ष लढत असलेल्या आंबेगाव मतदारसंघात ७२ टक्यांहून अधिक मतदान झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार लढत असलेल्या बारामतीतही पाच वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान झाले होते. इंदापूर मतदारसंघात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी आव्हान दिले आहे. येथील चुरस मतदानातही दिसून आली, किमान ८० टक्के मतदानाचा अंदाज आहे. शहरी भागातील नागरिकांनी मात्र मतदानाकडे पाठच फिरविली असल्याचे दिसून आले. पाच वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान शिवाजीनगर मतदारसंघात ४० टक्के तर पुणे कॅन्टोंमेंटमध्ये ४२ टक्के मतदान झाले. वडगाव शेरीमध्ये ४६ टक्के, कोथरुडमध्ये ५४ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यताही आहे. प्रशासनाकडून मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता कोठेही मतदानयंत्रांचा बिघाड झाला नाही. त्याचबरोबर मतदानयादीमध्ये प्रशासनाकडून दुरुस्त्या करण्यात आलेल्या असल्याने नाव नसल्याच्या तक्रारी कोठेही आल्या नाहीत. जिल्हाधिकारी सौरभ राव स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अहमदनगर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मतदानाच्या सरासरीने साठी ओलांडली. २००९ मध्ये मतदान ६७.८९ टक्के झाले होते. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीने ६३ टक्क्यांवर मजल मारली होती. मतदानाचा वाढीव टक्का प्रस्थापितांच्या विरोधात जातो, हा राजकीय अंदाज २००९ ने चकवला होता. त्यावेळी मातब्बरांनी आपले वर्चस्व सिद्ध केले होते. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. ४० वर्षांखालील सुमारे १५ लाख ५५ हजार मतदान आहे. त्यातील अडीच लाख तर वयाच्या बावीशीच्या आतील. लोकसभा निवडणुकीत हा टक्का युतीच्या, पर्यायाने भाजपाच्या पारड्यात गेला होता. बहुरंगी आणि चुरशीच्या लढतींमध्ये मतांचा हाच तरुण टक्का उलथापालथ घडवू शकतो. अन्य पक्षातील दिग्गजांना गळाशी लावून भाजपाने मारलेली मुसंडी सेनेसाठीही फटका देणारी ठरु शकते. राष्ट्रवादीची जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई होती तर काँग्रेस असलेले बळ टिकविण्यासाठी झगडत होती. भाजपाविरुद्ध अन्य, ही राज्यातील स्थिती येथेही होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी पुत्र वैभव यांच्या विजयासाठी जोर लावला होता. जिल्ह्यात ४२ मतदान केंद्र अतिसंवेदनशील होती. जामखेड मतदारसंघातील लोणी मसदपूर येथे रस्ता विकास न केल्याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. सोलापूर जिल्ह्यात यंदा मतदानाने साठी गाठली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा मतदानाचा उत्साह कमीच झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात ६२.५२ टक्के मतदान झाले होते.
चुरशीच्या लढतींमुळे वाढली उत्सुकता!
By admin | Updated: October 16, 2014 04:47 IST