ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष वेधत केंद्र सरकारने नवीन लोकसंख्या धोरण तयार करावे अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. संघाने अप्रत्यक्षपणे मुस्लिम लोकसंख्या रोखण्याचे आवाहन नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
देशातील धर्मनिहाय लोकसंख्येवाढीवर चर्चा करण्यासाठी रांची येथे संघाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी ३० ते ४० वर्षात भारत किती लोकसंख्येचा भार उचलू शकतो यावर चर्चा झाली. देशातील उपलब्ध साधनसंपत्ती, भविष्यातील गरज आणि लोकसंख्येतील असंतुलन लक्षात घेता केंद्र सरकारने नवीन लोकसंख्या धोरण तयार करुन तो सर्वांसाठी लागू करावा असा ठराव या बैठकीत संमत झाला. या ठरावात आसाम, बिहार आणि पूर्वोत्तर भारतातील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष वेधण्यात आले होते. हिंदू, जैन, शीख अशा भारतीय मूळ असलेल्या धर्मातील लोकसंख्येचे प्रमाण ८८ वरुन ८२ वर आले आहे. तर दुसरीकडे मुस्लिमांची लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. यामुळे सरकारने कुटुंब नियोजन धोरण लागू करायचे की नाही यावर विचार करणे गरजेचे आहे असे संघाचे नेते डॉ. कृष्णगोपाल यांनी बैठकीत सांगितले. कोणता धर्म किंवा संप्रदाय काय सांगतो यापेक्षा राष्ट्रहित जास्त महत्त्वाचे असते असेही त्यांनी नमूद केले.