सुधारित-आयएएस अधिकारी मृत्यूप्रकरण
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
आयएएस रवी मृत्यूप्रकरण
सुधारित-आयएएस अधिकारी मृत्यूप्रकरण
आयएएस रवी मृत्यूप्रकरण मृत्यूपूर्वी बॅचमेट महिलेला केले होते ४४ फोनआत्महत्येची दिली होती धमकीबेंगळुरु : कर्नाटकातील आयएएस अधिकार डी.के. रवी यांनी मृत्यूपूर्वी त्यांच्या तुकडीतील सहकारी महिलेला एका तासात ४४ वेळा फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली असतानाच सदर महिलेनेही रवी आपल्याशी लग्न करू इच्छित होते आणि लग्न न केल्यास जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी त्यांनी दिली होती, असा खुलासा केल्याने आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.दरम्यान या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी दबाव वाढत असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी शुक्रवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन त्यांच्या ताज्या घडामोडींची माहिती दिली. रवी हे एक अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या रहस्यमय मृत्यूने राज्यभरात जनआक्रोष पसरला होता. लोकसभेतही त्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटले होते. रवी यांनी ज्या महिलेला मृत्यूपूर्वी एका तासात ४४ फोन केले होते तिलाच काही एसएमएसही पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. आयएएस अधिकारी असलेली ही महिलाही विवाहित असून तिला एक अपत्य आहे. तिचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. २००९ साली एकाच तुकडीतील असल्याने रवी आणि सदर महिलेची लग्नापूर्वी मैत्री होती. रवी यांची माझ्याशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी सोमवारी अनेकदा मला फोन केले. मी लग्नास तयार झाली नाहीतर जीवाचे काही बरेवाईट करून घेण्याची धमकीही त्यांनी दिली होती. परंतु मी त्यांचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता, असा दावा या महिला अधिकाऱ्याने केला असल्याचे समजते. मंड्या जिल्हा पंचायतीच्या सीईओ असलेल्या या महिलेने राज्याचे मुख्य सचिव कौशिक मुखर्जी यांना रवीचे सर्व एसएमएस, कॉल्स आणि ई-मेलबाबत माहिती दिली आहे. आपण कुठल्याही चौकशीस तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणाची चौकशी सीआयडीच्या सुपूर्द करण्यात आली असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. सरकारच्या भूमिकेत बदल झाला नसल्याचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट केले होते. दुसरीकडे संयुक्त जनता दलाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस सरकारवर रवी यांच्या खासगी जीवनातील मुद्दा उपस्थित करून एका महिला आयएएस अधिकाऱ्यास यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. सत्य दडवून ठेवण्यासाठी असे केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वर्गमित्रांची निष्पक्ष चौकशीची मागणीदरम्यान डी.के. रवी यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आयएएस अधिकाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी केली. यासंदर्भात रवी यांच्या वर्गमित्रांकडून आम्हाला एक निवेदन मिळाले असल्याचे सेंट्रल आयएएस असोसिएशनचे सचिव आणि ज्येष्ठ आयएएस अधिकारी संजय आर. भुसरेड्डी यांनी नवी दिल्लीत सांगितले. (वृत्तसंस्था)